Raje
छत्रपती शिवाजीराजे भोसले
(१९ फेब्रुवारी १६३० ते ३ एप्रिल १६८०)

छत्रपती शिवाजी महाराज

हे एक भारतीय राजे आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. विजापूरच्या ढासळत्या आदिलशाहीमधून शिवरायांनी स्वतःचे स्वतंत्र राज्य निर्माण करून मराठा साम्राज्याची स्थापना केली. इ.स. १६७४ मध्ये रायगड किल्ल्यावर औपचारिकपणे छत्रपती म्हणून त्यांचा राज्याभिषेक करण्यात आला.


आपल्या कारकीर्दीत शिवाजी महाराजांनी मुघल साम्राज्य, गोवळकोंड्याची कुतुबशाही, विजापूरची आदिलशाही आणि युरोपियन वसाहतवादी शक्तींशी युती व शत्रुत्व दोन्ही केले. शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले.


किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच त्यांनी अनेक नवे किल्लेही उभारले.शिवरायांनी शिस्तबद्ध प्रशासकीय संघटनांसह सक्षम आणि प्रगतीशील नागरी शासन स्थापन केले. त्यांनी प्राचीन हिंदू राजकीय परंपरा, न्यायालयीन अधिवेशने पुनरुज्जीवित केली.


प्रदेशातील भूभागाची इत्यंभूत माहिती, आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि गनिमी काव्याचे तंत्र यांच्या सहाय्याने त्यांनी थोडक्या फौजेच्या सहाय्याने बलाढ्य अशा मुघल व आदिलशाही फौजांचा यशस्वीपणे सामना केला. राज्यकारभारात तत्कालीन रूढ असलेल्या पारशी भाषेऐवजी मराठी आणि संस्कृत भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले.


भारतीय स्वातंत्र्यलढ्यात राष्ट्रवादी नेत्यांनी शिवाजी महाराजांच्या पराक्रमी कथांचा वापर लोकांना एकत्रित आणण्यासाठी आणि त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी करून घेतला.